मुंबई : गोकुळाष्टमी निमित्त होणाऱ्या दहीहंडी उत्सवात थर लावताना अनेकदा गोविंद जखमी होतात, गंभीर दुखापती होतात. यावर उपचारांचा खर्च मोठा असतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत १.५० लाख गोविंदांसाठी विमा योजना राबवण्याची घोषणा केली आहे.
दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून प्रत्येकी ७५ रुपयांचा विमा कवच देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन (अंधेरी-पूर्व) या संस्थेच्या माध्यमातून समन्वय साधण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालकांना अधिकृत करण्यात आले आहे.
१.१२ कोटींचा निधी विम्यासाठी मंजूर
या विमा योजनेसाठी क्रीडा विकास निधीतून १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तात्काळ विमा उतरविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काहीजण या लाभापासून वंचित राहिले. यंदा त्यात आणखी २५ हजार गोविंदांची भर घालण्यात आली असून, एकूण दीड लाख गोविंदांना संरक्षण मिळणार आहे.
दहीहंडी साजरी करताना होणाऱ्या अपघातांमध्ये गोविंद गंभीर जखमी होण्याची शक्यता लक्षात घेता ही योजना महत्वाची ठरणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.