Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 15th, 2018

  संवेदनशील पत्र बाहेर येणं हा सरकारचा हलगर्जीपणा;सहानुभुतीसाठी प्रयत्न – नवाब मलिक

  मुंबई : डाव्या चळवळीतील सुधीर ढवळे यांना रिमांड मिळण्यासाठी पोलिसांनी एक पत्र सादर केले या पत्राच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कोर्टात सादर केलेले पत्र तासाभरात प्रसिद्धी माध्यमांपर्यंत कसे पोहोचले? पोलिसांनीच हे पत्र वाहिन्यांना पुरवले का? असे संवेदनशील पत्र बाहेर जाणे हा सरकारचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप करतानाच या पत्राच्या खरेपणाबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. कॉम्रेड आपल्या लेखनात ‘लाल सलाम’ व्यतिरिक्त कोणताच उल्लेख करत नसताना या पत्रात इंग्रजीत’ रेड सॅल्यूट’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

  काही दिवसांपूर्वी डाव्या चळवळीतील सुधीर ढवळेंसह काही कार्यकर्त्यांना गोवंडीमधून अटक करण्यात आली. लोकांनी याविरोधात आंदोलन केले असता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लपवून पुण्यात नेले. पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना त्याच दिवशी कोर्टात हजर करणे गरजेचे होते. पण पोलिसांनी तसे का केले नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला .

  डाव्या संघटनेचे कार्यकर्ते कधीही खऱ्या नावाचा उल्लेख करत नसताना या पत्रात थेट प्रकाश असे नाव घेतले आहे. हे पत्र पाहिल्यानंतर सरकारचा फर्जीपणा स्पष्ट दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप आहे की, ते कागदपत्रांची हेराफेरी करतात. नागपुरात अशा प्रकारच्या केसेस मुख्यमंत्र्यांवर आहेत. बनावट कागदपत्र सादर करण्यात मुख्यमंत्री माहीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातही फर्जीपणा केला असेल अशी शंका घेण्यास वाव असल्याचा टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.

  दरम्यान पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे तर त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करा. परंतु धमकीचे हे पत्र म्हणजे सगळी सहानुभुती मिळवण्यासाठी आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला

  संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण संभाजी भिडे हे पंतप्रधान मोदी यांचे गुरु असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, त्यांना भीमा-कोरेगाव सारख्या गंभीर प्रकरणातही क्लीन चिट देण्यात आली तरीही भिडे यांच्याविरोधात अंधश्रध्दा कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145