| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 3rd, 2018

  व्हॉट्स ॲपवरील पदभरतीच्या बनावट जाहिरातीपासून सावध राहण्याचे शासनाचे आवाहन

  मुंबई : व्हॉट्सॲपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १० जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन विविध पदांच्या भरतीबाबत बनावट जाहिरात व्हायरल होत आहे. अशी कोणतीही जाहिरात विभागामार्फत देण्यात आली नाही. तरी अशा बनावट जाहिरातींपासून सावध रहावे आणि आपली फसगत होणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.

  विविध व्हॉट्स ॲप ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची गट- ड वर्गातील लिपिक-३४, सहायक रोखपाल-२२, रोखपाल-१०, लेखापाल-६, गोपनीय लिपिक-१९, देयक लेखापाल-१४, शिपाई-५८, वाहनचालक-३४, नाईक-३१ अशी २२८ पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात फिरत आहे. जाहिरातीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-अपमु-२९१७/प्र.क्र.४४/१९ अ, दि.१० जानेवारी २०१८ नमूद केलेला आहे व जाहिरातीखाली स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम ‘अध्यक्ष निवड समिती तथा उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई’ असे दाखविण्यात आले आहे.

  मंत्रालयातील बऱ्याच विभागांकडून, शासकीय कर्मचारी व जनतेकडून दूरध्वनीवरुन ही जाहिरात खरी आहे काय याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा होत आहे. प्रत्यक्षात समाज माध्यमावर फिरणारी जाहिरात बनावट असून, सामान्य प्रशासन विभागामार्फत अशा प्रकारे पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही. जाहिरातीमधील बहुतांशी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. अशी जाहिरात शासनाच्या विभागाकडून दिली जात नाही. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे सामान्य प्रशासन विभाग व त्‍या विभागांतर्गत अन्य पाच कार्यालयांच्या आस्थापनेवरील १९५ अस्थायी पदांना दि. २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा शासन निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145