| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 3rd, 2018

  टेलिकॉम क्षेत्रातील जीपीएक्स कंपनी राज्यात तीनशे कोटींची गुंतवणूक करणार

  मुंबई: न्यूयॉर्क येथील टेलिकॉम क्षेत्रातील जीपीएक्स ही कंपनी मुंबईमध्ये तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जीपीएक्स कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलस टॉन्झी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. श्री. टॉन्झी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन डेटा सेंटरच्या तंत्रज्ञानाविषयी आणि इंटरनेट सर्व्हरबाबत माहिती दिली.

  जीपीएक्स कंपनीने अंधेरी येथे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले आहे. तेथे त्यांनी 140 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्या ठिकाणी गुगल, ॲमेझॉन, फेसबुक, नेटफ्लिक्स, फेडेक्स, व्हेरिझॉन आदी टेलिकॉम क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले सर्व्हर्स स्थापित केले आहेत.

  ही कंपनी मुंबईमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून महिनाभरात त्याचा शुभारंभ होणार आहे.

  यामुळे इंटरनेट सेवा घेणारी समाज माध्यमे, विविध कंपन्यांचे डेटा सेंटर यांना जलद गतीने आणि स्वस्त दरात सेवा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेटा सेंटरच्या निर्मितीला शुभेच्छा दिल्या.

  यावेळी जीपीएक्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज पॉल उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145