Published On : Fri, Sep 29th, 2017

एल्फिन्स्टन स्टेशनवरील दुर्घटनेला सरकार जबाबदारः खा. अशोक चव्हाण.

मुंबई: मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवर घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून या घटनेला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

तत्पुर्वी खा.अशोक चव्हाण यांनी आज परळ येथील केईएम हॉस्पिटला भेट देऊन एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकावर घडलेल्या दुर्देवी घटनेतील जखमींची विचारपूस केली व हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी जखमींच्या उपचाराबाबत चौकशी केली. यावेळी मृत्यू पावलेल्या प्रवाशांना श्रध्दांजली अर्पण करून खा. चव्हाण म्हणाले की आज सकाळी एलफिन्स्टन-परळ स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा मृत्यू झाला याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असून या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक करावाई करावी.

पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणारा हा पुल अरुंद आहे. या स्टेशनवरून ये-जा करणा-या प्रवाशांची संख्या फार मोठी असल्यामुळे कायम गर्दी होते. स्थानिक नागरिक व रेल्वेप्रवाशांनी वारंवार या मार्गावर नवीन पुलाची मागणी करुन देखील रेल्वेप्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. मुंबईत दररोज 10 लोक रेल्वे अपघातात आपला जीव गमावतात.

रेल्वेमंत्री पियुष गोयल हे मुंबईकर आहेत. गोयल 70 लाख मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा फक्त साडेसातशे प्रवाशी वाहतूकीची क्षमता असलेल्या बुलेट ट्रेनला जास्त महत्त्व देत आहेत हे दुर्देवी असून मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही, सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.