Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 29th, 2017

  ‘एल्फिन्स्टन’वरील 22 प्रवाशांच्या मृत्युप्रकरणी 302 दाखल करा!: विखे पाटील

  मुंबई: एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांच्या मृत्यू होण्याच्या प्रकरणी रेल्वे प्रशासनाविरूद्ध सदोष मनुष्यवधाच्या 302 कलमान्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

  या घटनेसंदर्भात संताप व्यक्त करताना विखे पाटील यांनी या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा, असेही म्हटले आहे. रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी 22 मुंबईकर कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे प्रशासन भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून, प्रवाशांच्या हालापेष्टांचे त्यांना सोयरसूतकच नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

  या घटनेत मृत्यमुखी पडलेल्या निर्दोष प्रवाशांच्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करून राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सरकारचे प्राधान्यक्रम चुकत असल्याचा परिपाक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, रेल्वे स्थानकांवरील गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सर्वपक्षीय खासदार-आमदारांची बैठक घेण्याची लेखी मागणी मी गतवर्षी 11 फेब्रुवारीला केली होती. पण त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

  नावे बदलणे आणि मोठमोठ्या घोषणा करणे, हे एककलमी धोरण स्वीकारून हे सरकार कारभार करत असून, त्याची किंमत सर्वसामान्यांना चुकवावी लागते आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यापूर्वी तेथील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असता तर जणांना प्राण गमवावे लागले नसते. मूठभर श्रीमतांसाठी बुलेट ट्रेन आणण्यापूर्वी मुंबईतील लाखो सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे, या शब्दांत त्यांनी सरकारच्या दिशाहिन धोरणांचा समाचार घेतला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145