Published On : Fri, Apr 5th, 2019

सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीबाला शासकीय नोकरी-मायावती

Advertisement

नागपूर : देशाचा पंतप्रधान हा उत्तरप्रदेश ठरवत असतो. यावेळी बसपा-सपा युती पंतप्रधान ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असून बसपा सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब व्यक्तिला शासकीय व अशासकीय सवेत कायमस्वरुपी नोकरी देईल, असे जाहीर आश्वासन बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे दिले.

बसपाच्या विदर्भातील लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी नागपुराती कस्तुरचंद पार्क येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. याप्रसंगी बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. सतिशचंद्र मिश्रा, आकाश आनंद, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी , बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, संदीप ताजणे, कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते.

मायावती म्हणाल्या, कॉग्रेस आणि भाजपा हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. निवडणूक जाहीरनाम्यात ते मोठमोठ्या घोषणा करतात. परंतु त्यांच्या हवाहवाई घोषणा फोल ठरल्या आहेत. देशातील जनेतेने त्यांचा चांगलाच अनुभव घेतला आहे. काँग्रेसने आता ७२ हजार रुपये देण्याची व १२ हजार रुपये किमान वेतनाची घोषणा केली आहे, परंतु यामुळे काहीच होणार नाही. गरीबांना स्थायी मदत होणार नाही. आम्ही सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीबाला शासकीय नोकरी देऊ प्रत्येक हाताला काम देऊ, असेही मायावती यांनी स्पष्ट केले.

मायावती यांची ही विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेली महाराष्ट्रातीलच पहिली जाहीर सभा होती. यावेळी बसपाचे विदर्भातील उमेदवार मोहम्मद जमाल (नागपूर), डा. विजया नंदुरकर (भंडारा-गोंदिया), हरिश्चंद्र मंगाम (गडचिरोली-चिमूर), अरुण किनवटकर (यवतमाळ -वाशिम), डॉ. शैलेश कुमार अग्रवाल (वर्धा), सुशील वासनिक (चंद्रपूर), अरुण वानखेडे (अमरावती), अब्दुल हफीज (बुलडाणा), आणि बी. सी. कांबळे (अकोला) प्रामुख्याने व्यासपीठावर होते.

चौकीदाराची नाटकबाजी आता चालणार नाही
ज्या प्रमाणे काँग्रेस आपल्या चुकीच्या धोरणांमुळे केंद्रातून आणि राज्यातील सत्तेतून बाहेर पडली. त्याचप्रकारे भाजपलाही त्याच्या चुकीच्या धोरणांमुळे सत्तेतून जावे लागेल. यावेळी भाजप पुन्हा येणार नाही. चौकीदाराची कुठलीही नाटकबाजी आता चालणार नाही. भाजप किंवा त्याच्या मित्र पक्षातीललहान-मोठ्या सर्व चौकीदारांनी आपली शक्ती पणाला लावली तरी ते निवडून येणार नाही, असा दावाही मायावती यांनी केला.

काँग्रेस-भाजप आरक्षण विरोधी
काँग्रेस व भाजपा दोघेही आरक्षण विरोधी आहेत. काँग्रेसनेच मंडल आयोग लागू होवू दिला नाही. बसपाच्या दबावामुळे व्ही.पी.सिंग सरकरने मंडल आयोग लागू केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिले. तेव्हा जातीयवादी मानसिकतेच्या भाजपने व्ही.पी.सिंग सरकारचे बाहेरून असलेले समर्थन काढले. काँग्रेस आणि भाजप दोघेही सारखेच आहेत. ते आतुन मिळालेले आहेत. जातीवादी मानिसकतेमुळे त्यांनी आरक्षणाचा कोटा कधीच भरला नाही. पदोन्नतीचे आरक्षण प्रभावहीन बनवले. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मागासवर्गीयांना मिळू शकला नाही, अशी टीकाही मायावती यांनी केली.

– काँग्रेसचा बोफोर्स तर भाजपचा राफेल
मायावती म्हणाल्या देशात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. संरक्षण क्षएत्रही यातून सुटलेले नाही. काँग्रेसने केलेले बोफोर्स आणि भाजपचे राफेल याचे उदाहरण आहे. आपले अपयश लपवण्यासाठी काँग्रेसप्रमाणेच भाजपही विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या प्रकरणात फसवित आहे. यासाठी सीबीआय, ईड व आयटीचा वापर केला जात असल्याची टीकाही मायावती यांनी केली.