Published On : Thu, Aug 20th, 2020

शासकीय आयटीआय मौदा कोविड सेंटरमध्ये एकही बेड नाही,

रुग्णांचे प्रचंड हाल, बेवारस सोडले भाजपा प्रदेश सचिव बावनकुळे यांनी दिली सेंटरला भेट

नागपूर: शासकीय आयटीआय मौदा येथील कोविड सेंटरमध्ये अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पण कोविड सेंटरची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या सेंटरमध्ये एकही बेड नाही, टेबल खुर्ची नाही की डॉटरचीही व्यवस्था नाही. शासनाच्या आरोग्य विभागाने या सेंटरमध्ये कोणत्याही व्यवस्था केल्या नाहीत.

त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होत असून रुग्णांना बेवारस सोडले असल्याचे भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांना दिसले. बावनकुळे यांनी आज या सेंटरला भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला. या सर्व प्रकाराबद्दल बावनकुळे यांनी प्रचंड संताप व्यत केला आहे व शासनाविरोधात आपली नाराजी व्यत केली आहे.

या कोविड सेंटरमध्ये एकही टेबल आणि खुर्ची दिसत नाही. कोरोनाग्रस्त रुग्ण सेंटरमध्ये गेला तर त्याला जमिनीवर बसावे लागते. तपासणी करण्यास गेलेल्या डॉटरांना आवश्यक असलेल्या कोणत्याही वस्तू येथे नाहीत. डॉटरांना आपल्या बॅगमधून सामान काढावे लागते.तालुका आरोग्य अधिकार्‍याला विचारणा केली असता ते कोणतेही उत्तर देत नाहीत. तपासणीचा अहवाल लिहिण्याकरिता रुग्णाच्या जवळ एकही पेपर नाही. ऑसीजन सिलेंडरची व्यवस्था नाही.

या सेंटरमध्ये शौचालय साफ करण्यासाठी कुणीही नियमित येत नाही. ४-५ दिवसातून एकदा स्वच्छता केली जाते असे सांगण्यात आले. दूषित पाणी मौद्यात येत असल्यामुळे तेच पाणी पिण्यासाठी व तेच वापरण्यासाठी लोक घेतात. येथील तालुका आरोग्य अधिकार्‍याला तात्काळ हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी त्वरित चौकशी करावी अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.यावेळी आ. टेकचंद सावरकर, नगर पंचायत उपाध्यक्ष शालिनी कुहीकर, भारती सोमनाथे, हरीश जैन, नीलिमा घाटोळे, तालुका अध्यक्ष शरद भोयर, प्रकाश यळने आदी उपस्थित होते.