| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 3rd, 2021

  सरकार गोंधळलेले; ही जनभावनेची थट्टा : ऍड. धर्मपाल मेश्राम

  राज्य सरकारच्या ‘अनलॉक’ घुमजाव प्रकरणी घणाघात

  नागपूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील जबाबदार मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक ची घोषणा करणे आणि लगेचच काही कालावधीत राज्य मुख्य सचिवांच्या कार्यालयामार्फत सध्या अनलॉक नाही हे स्पष्ट करणे ही राज्य सरकारची गोंधळली मानसिकता प्रतीत करणारी बाब असून या संकटाच्या प्रसंगी सरकारद्वारे जनभावनेची केलेली थट्टा आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर ‘अनलॉक’ची घोषणा करणे आणि लगेच त्यावर घुमजाव करण्याच्या ओढवलेल्या नामुष्कीवर ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.

  कोरोनाच्या या संकटामध्ये ओढवलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाले आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी त्रस्त असलेल्या जनतेवर आरोग्य सुविधांच्या कमतरतेने अधिक आघात केला आहे. अशा स्थितीत राज्यातील एका जबाबदार मंत्र्याने राज्यातील 18 शहरे अनलॉक होत असल्याची केलेली घोषणा केली.

  मात्र या निर्णयावर काही वेळातच राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयातून पत्राद्वारे असा कुठलाही निर्णय झालेला नसून तो विचाराधीन असल्याचे स्पष्ट करणे, ही घटना राज्य सरकारची गोंधळलेली मानसिकता दर्शवित असून ही सद्यपरिस्थितीत बेरोजगारी, भुखमरी व आरोग्य सुविधांना कंटाळलेल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या भावनांची थट्टा आहे, असाही आरोप ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145