Published On : Thu, Jul 18th, 2019

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे – डॉ. फुके

Advertisement

मुंबई : गोसेखुर्द प्रकल्पामुळे सुरबोडी आणि सौंदळ गावातील अंशत: बाधित प्रकल्पग्रस्तांचे तसेच मौजे तिड्डी गावठाण्यातील ऐच्छिक नऊ कुटूंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. त्याचबरोबर धारगाव उपसा सिंचन योजनेतील भंडारा टप्पा एक ही योजना पुढील एक महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.

आज मंत्रालयात भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द प्रकल्पामुळे अंशत: बाधितांचे पुनर्वसन, ऐच्छिक पुनर्वसन व भुसंपादन यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.फुके म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत विशेष बाब म्हणुन मौजे तिड्डी या गावठाणच्या कुटूंबियांचे ऐच्छिक पुनर्वसनाअंतर्गत पुनर्वसन करण्यात यावे. धारगाव उपसा सिचन भंडारा टप्पा एक ही योजना गोसेखुर्द प्रकल्पामध्ये अंतर्भुत केल्यास नजीकच्या गावांना त्याचा फायदा होणार आहे. टप्पा एक अंतर्गत ३ हजार २०० हेक्टर अंतर्गत ३५० कोटीचे पाणी उपलब्ध होणार असून, एकूण ६९ गावांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे टप्पा एक तातडीने पूर्ण करण्यात यावा असे निर्देश मंत्री डॉ.फुके यांनी दिले. तसेच, बेळघाट आणि शेळीघाट संदर्भातील कामाची सुरवातही तातडीने करावी असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत आमदार रामचंद्र अवसरे, महसुल व वन विभागाचे अवर सचिव शहाजदान मुलानी, जलसंपदा विभागाचे उपसचिव म.ई. धरणे, गोसेखुर्द प्रकल्प पुनर्वसन विभाग पथक चे कार्यकारी अभियंता विजयश्री बुराडे आदी उपस्थित होते.