Published On : Thu, Jul 18th, 2019

प्रत्येक झोनला एक ‘डॉग व्हॅन’ द्या…!

Advertisement

आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश : मशीनच्या साहाय्याने नालेसफाईसाठी घेणार विशेष बैठक

नागपूर : नागपूर शहरात कुत्रे आणि डुकरांचा त्रास प्रचंड वाढला आहे. यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येतात. मात्र यंत्रणा अपुरी असल्यामुळे तक्रारींचा निपटारा करणे शक्य नाही. केवळ दोन ‘डॉग व्हॅन’च्या भरोशावर हे शक्य नसल्यामुळे प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी एक ‘डॉग व्हॅन’ असायलाच हवी, यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

नवनिर्वाचित आरोग्य समितीची प्रथम बैठक बुधवारी (ता. १७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह उपसभापती नागेश सहारे, सदस्य लहुकुमार बेहते, लिला हाथीबेड, सरीता कावरे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका प्रणिता शहाणे, ममता सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, टाटा ट्रस्टचे अधिकारी डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते.

‘डॉग व्हॅन’ संदर्भात माहिती देताना डॉ. गजेंद्र महल्ले म्हणाले, प्रत्येक झोनला एक ‘डॉग व्हॅन’ असावी यासाठी आठ नव्या व्हॅनचा प्रस्ताव पाठविला आहे. दोन व्हॅन आहेत. त्यामुळे प्रत्येक झोनला एक ‘डॉग व्हॅन’ उपलब्ध करून देता येईल. मात्र, सध्या असलेल्या दोन्ही ‘डॉग व्हॅन’ जुन्या असल्यामुळे आठ ऐवजी दहा व्हॅनचा प्रस्ताव देण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

बऱ्याच नाल्यांची सफाई आजही मनुष्यबळाद्वारे केली जाते. त्यामुळे या नाल्यांचीही सफाई मशीनने करता येईल यासाठी नाल्यांची रुंदी वाढविता येईल का, यादृष्टीने अभ्यास करून अहवाल तयार करण्यात यावा. यापुढे संपूर्ण नाल्यांची सफाई मशिनद्वारेच व्हावी यादृष्टीने चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष बैठक बोलविण्यात येईल, असेही श्री. कुकरेजा यांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेली आरोग्य सेवा अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याचे कार्य सुरू आहे. त्यापैकी १७ आरोग्य केंद्रांचा कायापालट झाला असून येथे लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सदर येथील प्रयोगशाळेत सुमारे ४१ चाचण्या पूर्णत: आता मोफत होतात. आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनीही तत्पर राहावे, असे आवाहन आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी केले.

शहरातील १४ दहनघाटांपैकी अंबाझरी घाटावर दहनासाठी ‘ब्रिकेटस्‌’ उपलब्ध आहेत. भविष्यात मोक्षधाम, मानकापूर, सहकार नगर, गंगाबाई घाट आणि मानेवाडा येथेही ‘ब्रिकेटस्‌’ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. त्याला गती देण्याचे निर्देशही सभापती कुकरेजा यांनी दिले. गणपती विसर्जनाच्या वेळी कृत्रिम रबर टँक लावले जातात. परंतु ते एक-दोन वर्षेच कामात येतात. त्यापेक्षा सर्वच ठिकाणी सेंट्रींगचे कृत्रिम टँक उभारण्यात यावे. त्यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नाला गँगला लवकरच सुरक्षा कीट देण्यात येणार असून सफाई कर्मचाऱ्यांनाही ग्लोव्हज़्‌ पुरविण्याचे निर्देश सभापतींनी दिले. मनपाअंतर्गत सुरू असलेल्या सर्व दवाखान्यांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी पुढील महिनाभरात बायोमेट्रिक पद्धतीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कचरा ट्रान्सफर स्टेशनसाठी दहापैकी सहा झोनच्या जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. त्यासंदर्भातील कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देशही सभापतींनी दिले.

बैठकीत आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांनी त्यांच्या विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. सध्या असलेले सफाई कर्मचारी, ऐवजदार, बीट या यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामाचे स्वरूप, भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकण्यात येणारा कचरा, त्यावर होणारी प्रक्रिया आदींविषयीही त्यांनी सांगितले. आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार यांनी नागपूर महानगरपालिकेअंतर्गत शहरात असलेल्या दवाखान्यांची माहिती, कामाचे स्वरूप आदींविषयी माहिती दिली तर डॉ. टिकेश बिसेन यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कायापालट करण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यामुळे झालेले फायदे याबाबत सविस्तर सांगितले. उपस्थित सदस्यांनीही यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून आरोग्य विभागाची माहिती जाणून घेतली. बैठकीला सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.