Published On : Tue, Aug 27th, 2019

गोरखपूर एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड

Advertisement

दोन तृतियपंथीयांना अटक

नागपूर : आरपीएफच्या विशेष पथकाने नागपूर – बल्लारशाह दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेसवर धाड घालून दोन तृतियपंथीयांना पकडले. त्याना आरपीएफ ठाण्यात आणून रेल्वे नियमानुसार कारवाई केली.

नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या मध्यभागी असल्याने येथून दिल्ली, मुंबई, हावडा आणि चेन्नई मार्गाने गाड्या धावतात. नागपूर आऊटरवर गाड्यांची गती कमी असते. त्यामुळे तृतियपंथी आऊटरवर थांबून असतात. संधी मिळताच गाडीत बसतात. आधी जनरल कोच मधून प्रवाशांकडून वसूली करतात. नंतर स्लीपर डब्यातील प्रवाशांना त्रास देतात. हातवारे करीत, अश्लिल शिवीगाळ आणि यानंतरही कोणी पैसे न दिल्यास मारपीट करण्यास मागेपुढे पाहात नाही.

कुटुंबीयांसमोर मान खाली घालायला लावतात. त्यांच्या या प्रकारामुळे प्रवासी भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती आरपीएफच्या विशेष पथकाला मिळाली. या पथकातील सदस्य उपनिरीक्षक के.सी. जटोलिया, एन.पी. वासणिक, शैलेश भास्कर, संजय खंडारे, राजू खोब्रागडे, श्याम वाडोकर आणि नवीनकुमार यांनी गोरखपूर एक्स्प्रेसचा ताबा घेतला. नागपूर ते बल्लारशाह दरम्यान प्रत्येक बोगीत पाहणी करीत होते.

यावेळी मागच्या जनरल डब्यात दोन तृतियपंथी प्रवाशांकडून वसूली करताना आढळले. त्या दोघांनाही ताब्यात घेवून आरपीएफ ठाण्यात आणले. त्यांच्यावर रेल्वे नियमानुसार कारवाई करण्यात आली.