Published On : Thu, May 16th, 2019

रेल्वे तिकीटांचा गोरखधंदा उघडकीस

Advertisement

रेल्वे तिकिटांसह सव्वा लाखाचे साहित्य जप्त

नागपूर: आरपीएफच्या पथकाने रेल्वे तिकीटांची दलाली करून प्रवाशांची पिळवणूक करणाºया विरूध्द विशेष मोहिम सुरू केली आहे. विशेष म्हणजे बनावट आयडीव्दारेही रेल्वे तिकीट बनवून देण्याचे प्रकार वाढत असल्याने आरपीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कळमना ठाण्याच्या हद्दीत भवानीनगरातील एसआरएम टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कार्यालयावर धाड मारली. छापेमार कारवाईत दलालासह सव्वा लाख रुपयांचे साहित्य, रेल्वे तिकिट जप्त करण्यात आले आहे़ ही कारवाई आज बुधवारी करण्यात आली.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्व द्वारावर (संत्रामार्केट) असलेल्या रेल्वे तिकिट केंद्राची तपासणी करत असताना पथकाला तेथे शिवानंद रामाधर मौर्या हा व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आला़ त्याची विचारपूस केली असता त्याने ट्रॅव्हल्स एजेंसी चालवत असून, ग्राहकांना कमिशनवर तिकिटे उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले़ त्याने दिलेल्या माहितीवरून आरपीएफच्या पथकाने कळमना पोलिसांच्या मदतीने भवानीनगरातील एसआरएम टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कार्यालयावर धाड मारली. या कारवाईत लॅपटॉपमधील बनावट आयडीमधून ५७ हजार ६४५ रुपये किमतीची एकूण ३४ रेल्वे आरक्षण ई-तिकिटे, ३ हजार ६०० रुपये किमतीची एक रेल्वे काऊंटर तिकिट जप्त करण्यात आली़ तिकिटांसोबतच, ३५ हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप व डोंगल, १२ हजार रुपये किमतीचा एक प्रिंटर, १५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असे एकूण १ लाख २५ हजार ८४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ आरोपीला अटक केली. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानीशंकर नाथ यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक आऱ आऱ जेम्स, निरिक्षक एसके़ मिश्रा, उपनिरिक्षक शिवराम सिंह, स़ उपनिरिक्षक रामनिवास यादव, आरक्षक प्रदीप कुमार, आरक्षक अमीत बारापात्रे यांनी केली़