मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता सरकारने दिलासा देत स्पष्ट केलं आहे की आजपासून निधी ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईल.
अजित पवार यांचं स्पष्टीकरण-
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “लाडक्या बहिणींसाठी नियोजन केलं आहे, आणि निधी लवकरच त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. सर्व योजनांचे पैसे वेळेवर देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.
विरोधकांनी हप्त्याच्या उशिराबाबत सरकारवर टीका केली असली तरी, आता ही प्रक्रिया मार्गी लागल्याने राज्यातील लाखो महिलांना लवकरच दिलासा मिळणार आहे.