Published On : Tue, Oct 5th, 2021

गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

– विकास हा राजकारण विरहीत असला पाहिजे – मंत्री उदय सामंत

गडचिरोली : कोणताही विकास हा राजकारण विरहीत असला पाहिजे. मी विद्यापीठाचा सहकारी म्हणून शिक्षणासाठी कार्य करत आहे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाचा जमीनीचा जो रखडलेला प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, सोबतच आदिवासी विकास व संशोधन केंद्र यासाठी रूसा अंतर्गत २० कोटी रुपये मंजूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. २०२२-२३ या वर्षात अभियांत्रिकीची शाखा विद्यापीठात सुरू करणार असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात यावेळी त्यांनी केले. यावेळी मंचावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, तसेच व्यवस्थापन परिषदेचे व अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे व आमदार डॉ.देवराव होळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना मध्ये विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सांगितले की आजचा दिवस हा विद्यापीठाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे कारण आजच्या दिवशी १० वर्ष पूर्ण होत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही विद्यापीठाने यशाची अनेक शिखरे सर केली आहे. सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या परिसरात ना.उदय सामंत यांच्या हस्ते जीवन समर्थन प्रणालीयुक्त रूणवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि रासेयो विभागाव्दारे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य विभागाद्वारे संशोधन पत्रीकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात तळोधी (बा.) येथील डॉ. तुलसीदास विठूजी गेडाम यांचा जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाला दहा वर्ष पूर्ण होत असताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले व कोरोना काळात विशेष कार्य केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व शिक्षकांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन डॉ. नरेंद्र आरेकर आणि आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी मानले.