Published On : Fri, Sep 28th, 2018

गोळवलकर गुरुजींचे विचार कालबाह्यच : मा. गो. वैद्य

नागपूर : गोळवलकर गुरुजींनी ‘बंच आॅफ थॉट’मध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट देशासाठी धोकादायक असल्याचे लिहिले आहे. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील संमेलनात त्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली. यात कालानुरूप मोहन भागवत यांची भूमिका योग्य असून ‘बंच आॅफ थॉट’मध्ये कालानुरूप बदल शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारवंत तथा संघाचे माजी प्रवक्ता मा. गो. वैद्य यांनी केले. याप्रसंगी वैद्य यांनी गोळवलकरांचे विचार आता कालबाह्यच ठरत आहेत, असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.

प्रेस क्लब आॅफ नागपूरच्या वतीने वैद्य यांच्या मीट द प्रेसचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.

मा. गो. वैद्य पुढे म्हणाले, कालानुरूप भारतीय राज्यघटनेत अनेक बदल करण्यात आले. १९५० ते १९७६ दरम्यान सेक्युलर हा शब्द घटनेत नव्हता. त्यानंतर तो समाविष्ट केला. त्यामुळे त्यापूर्वी घटना धर्मनिरपेक्ष नव्हती असे म्हणणे चुकीचे आहे. काळानुरूप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणात बदल होत असतील त्यात काहीच गैर नाही.

ते म्हणाले, राममंदिर व्हावे असे वाटते, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ते अवलंबून आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना एक राष्ट्र, एक विचार यावर अवलंबून आहे. यात भूमीशी संबंधित भावना, त्याचा इतिहास आणि मूल्यनिष्ठा यांचा समावेश आहे.

मस्जिद आणि मुस्लीम यांचा एकात्मिक संबंध नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आणीबाणीनंतर देशात संघासोबत काम करणारे अनेक मुस्लीम होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात नमाज पढली आहे. अनेकदा हिंसाचारात मुस्लिमांचा संहार झाला की त्याची चर्चा होते. परंतु हिंदूंवरील हिंसाचाराची वाच्यता होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे
भारतीय जनता पक्ष काँग्रेसमुक्त भारताची भाषा करीत असताना मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. ‘लोकशाहीच्या अस्तित्वासाठी दोन पक्ष असणे महत्त्वाचे आहे. अमेरिका, इंग्लंडमध्ये दोन पक्ष आहेत. लोकशाही मजबूत होण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे,’ असे मत वैद्य यांनी व्यक्त केले.