
नागपूर : गोकुळपेठ मार्केट परिसरात झोपडीच्या आडून सुरू असलेल्या सट्टा-मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, तीन मोबाईल आणि सट्ट्याचे साहित्य असा एकूण ५१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख API भगवान कोळी यांना गोकुळपेठ मार्केटमध्ये झोपडीच्या आडून अंक सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर एस्कॉर्ट पथकाने अंबाझरी पोलिसांच्या सहकार्याने घटनास्थळी छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच सट्टा खेळणारे काही जण पसार झाले. मात्र, सट्टा चालविणाऱ्या जितेंद्र महादेव वागाडे, संतोष महादेव वागाडे आणि सागर रमेश गवई या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान कोळी, API शारदा भोपाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय गिरी, ओमप्रकाश खंडाते, आशिष गायधने आणि चंद्रकांत मेहत्रे यांच्या पथकाने केली.




