Published On : Mon, Nov 15th, 2021
By Nagpur Today Nagpur News

गोखले, हे आमच्या वाडवडिलांनी ‘त्यागाने मिळविलेले स्वातंत्र्य’ आहे!

Advertisement

विक्रम गोखलेंना आणि कंगना रनौटला १९४७ साली भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भिकेत मिळालेले आहे, हे वाटणे स्वाभाविक आहे कारण यांच्या बापजाद्यांपैकी कुणीही त्यासाठी आंदोलने केली नाहीत, तुरुंगवास भोगला नाही, लाठ्या-गोळ्या खाल्ल्या नाहीत, फासावर गेले नाहीत; काहीही केले नाही!

मात्र या देशातल्या लाखो स्त्री-पुरुषांनी त्यासाठी त्याग केलेला आहे, घरादाराची पर्वा न करता देशासाठी आंदोलने केलीत, लाठ्या-गोळ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला आणि काही तर फासावरही गेले. त्यांना आणि त्यांच्या आमच्यासारख्या मुलाबाळांना हे स्वातंत्र्य त्यागाने मिळविलेले स्वातंत्र्य वाटते, आहेच ते.

काल आमच्या नागपूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वातंत्र्य संग्राम सैनिक लीलाताई चितळे यांचा जो उद्वेगपूर्ण संताप व्यक्त करणारा व्हिडीओ व्हायरल झाला तो पाहून माझ्यातरी डोळ्यांत अक्षरशः पाणी आले.

Advertisement

या पोस्टसोबत अमरावती जेलच्या रेकॉर्डची दोन पानांचा फोटो दिला आहे ज्यात शेंदूरजना, तहसील मोर्शी, जिल्हा इमारती येथील काही स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची नोंद आहे. त्यात तीन लोक माझ्या कुटुंबातील आहेत. माझे वडील वामनराव कनाटे, त्यांचे सख्खे काका महादेवराव आणि एक नात्यातील काका अण्णाजी लिखितकर हे ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक. याशिवाय वरुडजवळ चांदस-वाठोडा नावाचे गाव आहे तिथे आमची म्हणजे कनाटे कुटुंबियांची दोन घरे होती. त्या कुटुंबातुनही माझ्या वडिलांचे एक काका भागवतराव कनाटे आंदोलनात भाग घेतला म्हणून तुरुंगात गेले होते. म्हणजे चार कुटुंबांतून तीन स्वातंत्र्य संग्राम सैनिक!

जेलमधून सुटून आल्यानंतर यापैकी अनेकांच्या जीवनाची अक्षरशः वाताहत झाली. माझे वडीलच पुढे शिक्षण घेऊ शकले नाही कारण त्यांना शाळेतून काढून टाकले होते. ते बऱ्याच उशिरा नागपुरात येऊन स्थायिक होईपर्यंत अक्षरशः भारतभर फुटकळ नोकऱ्या करत फिरत राहिले, अर्धपोटी झोपले, रस्त्यावर झोपले, मुंबईत गोदीत टिनाच्या पत्र्यांनी जहाजे साफ केली.

हे सगळे विक्रम गोखलेंसारख्यांना काय कळणार. ज्यांची लाठ्या-गोळ्या आणि तुरुंगवासाच्या साध्या कल्पनेने गाळण उडायची ती मंडळी स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून चांगली मैलभर दूरच राहिली. विक्रम गोखलें ज्या विचारांचे पाईक आहेत ती हीच मंडळी होती. त्यांना १९४७चे स्वातंत्र्य भिकेत मिळाले असेच वाटणार.

मला असभ्य भाषेत लिहिताना नैतिक त्रास होतो म्हणून नाहीतर कालपासून मला या भिकारड्या माणसाला जाहीररीत्या सणसणीत नागपुरी शिव्या द्यायची इच्छा होत आहे पण मी त्या देणार नाही.

या गोखले आणि रनौटचा तीव्र शब्दांत निषेध केला पाहिजे.

…गणेश कनाटे

As Posted by Ganesh Kanate – Senior Journalist in his Facebook

Pic Courtsey Ganesh Kanate

Pic Courtsey Ganesh Kanate

Pic Courtsey Ganesh Kanate