Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Mar 24th, 2018

  ‘देव त्यांना बुद्धी देवो’; ‘उंदीर घोटाळ्या’वरून एकनाथ खडसेंना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

  Sudhir Mungantiwar
  मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत केला होता. याचे प्रत्युत्तर देताना देव त्यांना सुबुद्धी देवो असे म्हणत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंना उपरोधात्मक टोला हाणला आहे. त्यामुळं आता भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्येच उत्तर आणि प्रत्युत्तरांची लढाई सुरु झाल्याचे दिसतं आहे.

  शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना सुधिर मुनगंटीवार यांनी उंदीर घोटाळ्यावरुन खडसेंचे कान टोचले. ते म्हणाले की, प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा अर्थ काढणे चुकीचं आहे. देव त्यांना बुद्धी देवो असे म्हणत नाव न घेता त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, चुकीचा अर्थ काढून घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असं म्हणने चुकीचं आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानाला खडसे काय उत्तर देतात हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे.

  काय म्हणाले होते खडसे
  मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने आधी उंदरांची संख्या मोजण्यात आली. ती चक्क ३ लाख १९ हजार ४०० भरली. सहा महिन्यांत या उंदरांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात कंत्राटदारास कार्यादेश देताना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आणि कंत्राटदाराने ही मोहीम अवघ्या सात दिवसांत फत्ते केली, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.

  एका मिनिटात ३१ मूषकांचा संहार
  कंत्राटदाराचे उंदीर मारण्याचे कौशल्य लक्षात घेता ३ मे २०१६ ते १० मे २०१६ या कालावधीत (विद्यमान सरकारच्या काळात) दर मिनिटाला ३१.६८ उंदीर या प्रमाणे दरदिवशी ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारण्यात आले. त्यात काही पांढरे, काही काळसर, काही मोठे, लठ्ठ तर काही अगदीच लहान होते, अशी वर्गवारी खडसे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

  दहा मांजरींमध्ये भागले असते… या उंदरांची विल्हेवाट कशी लावली याची माहिती मिळाली नाही. मोजमाप पुस्तिकेत सात दिवसांत त्यांचे निर्मूलन केल्याचे नमूद आहे. ज्या मजूर सहकारी संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते, त्या संस्थेने उंदीर मारण्याचे विष बाळगण्याची परवानगी घेतलेली नव्हती. हा खटाटोप करण्यापेक्षा मंत्रालयात दहा मांजरे सोडली असती तरी उंदीर मेले असते, असा चिमटाही खडसेंनी काढला.

  मंत्रालयात तीन लाख, मग राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांत किती असतील?
  सात दिवसांत एवढे लाख उंदीर मारल्याचे दाखवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, अशी उपरोधिक मागणीही खडसेंनी केली. एकट्या मंत्रालयात ३ लाख १४ हजार उंदीर असतील तर मग राज्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांतील उंदरांची संख्या किती, असा खोचक सवाल खडसेंनी करताच हशा पिकला.

  खडसेंनी उपस्थित केलेल्या या ‘उंदीरकांडावर’ माहिती घेऊन ती सभागृहासमोर ठेवू, असे उत्तर सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145