
नागपूर : गणेश विसर्जनाची बंदोबस्त ड्युटी पूर्ण करून घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) रविंद्र महादेवराव कोकांडे (५६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ड्युटीवरून घरी परतल्यानंतर पहाटे अचानक त्यांच्या छातीत त्रास सुरू झाला होता. त्यांच्या निधनाने नागपूर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
रविंद्र कोकांडे हे नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. २७ सप्टेंबरच्या रात्री सुमारे दीड वाजता त्यांनी बंदोबस्ताची ड्युटी पूर्ण केली आणि कपिलनगर येथील घरी परतले. जेवण करून ते झोपले.
पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक त्रास जाणवू लागला. त्यांनी मुलगा ऋषभ याला याची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने टेका नाका येथील होप हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धंतोलीतील प्लाटिना हॉस्पिटल आणि मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी ११.२७ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ASI रविंद्र कोकांडे यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळताच नागपूर पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला. कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळाऊ कर्मचारी म्हणून ते सहकाऱ्यांमध्ये परिचित होते. कपिलनगर पोलिसांनी वैद्यकीय सूचनेनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी शीला आणि दोन मुले ऋषभ व रोहित असा परिवार आहे. नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कपिलनगर घाट येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून बंदुकीची सलामी देण्यात आली.




