Published On : Mon, Jul 8th, 2019

बचत गटातील महिलांना झाडे लावण्याचे वर्षभराचे काम द्या : पालकमंत्री

-डोंगरगाव जनसंवाद कार्यक्रम
-सर्वाधिक अर्ज घरकुलांसाठी
-चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांचे कौतुक

नागपूर: शासनाच्या नरेगा या योजनेअंतर्गत झाडे लावण्याचे व वर्षभर झाडांचे संगोपन व्हावे, यासाठी महिला बचत गटातील महिलांना नरेगाच्या 206 रुपये रोजंदारीप्रमाणे वर्षभर काम देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज डोंगरगाव जनसंवाद कार्यक्रमात प्रशासनाला दिले.

डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, दिलीप नंदागवळी, सरपंच पप्पू ठाकूर, नरेश भोयर, सरपंच यशपाल भटेरो, सुनील कोडे, सरपंच सुरेंद्र बानाईत, सुनील बोरीकर आदी उपस्थित होते.

या जनसंवाद कार्यक्रमात मंगरुळ, डोंगरगाव, पांजरी लोधी, रुई, गवसी मानापूर आदी गावचे नागरिक सहभागी झाले होते. एकूण 12 गावांमधील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने व नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती या कार्यक्रमात सांगण्यात आली. आपल्या कामाचा आढावा घेताना चांगले काम केले असल्याचे दिसून आले तेव्हा पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍याचे कौतुकही करण्याची संधी सोडली नाही.

पंतप्रधान आवास योजनेचे नागरिकांचे सर्वाधिक अर्ज यावेळी पालकमंत्र्यांकडे आले. ही संपूर्ण योजना ऑनलाईन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या योजनेत ज्या लाभार्थींनी अर्ज केले त्या सर्वांचे अर्ज स्वीकारा. तसेच कवेलू व टिनाची घरे असलेल्या नागरिकांनीही या योजनेत अर्ज करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. ज्या नागरिकांनी शौचालयांची मागणी केली, त्या सर्वांना शौचालये देण्याचे निर्देश दिले. तसेच ज्यांनी शौचालये बांधली अशा नागरिकांना शासनाचे 12 हजार रुपयांच्या अनुदानाचे धनादेश देण्यात आले.

संजय गांधी निराधार योजना, वर्ग 2 चे वर्ग 1 मधील प्रक़रणे, पाणीपुरवठा विभाग, पंतप्रधान किसान सन्मान योजना आदींची माहिती नागरिकांसमोर अधिकार्‍यांनी सादर केली. संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ होऊन आता 600 ऐवजी 1000 रुपये देण्यात येतात. पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेची माहिती नागरिकांना दिली. डोंगरगाव हे महावितरणच्या खापरी केंद्रांतर्गत येते. साडे आठ हजार ग्राहकांसाठी 6 उपकेंद्र येथे असल्यामुळे कुणालाही कमी दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. तसेच भारनियमनही नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

केंद्र शासनाच्या आयुष्यमान योजनेची माहिती यावेळी देण्यात आली. गरीब रुग्णाला कार्ड काढल्यास 5 लाख रुपयांपर्यंतची मदत या योजनेतून दिली जात आहे.

कृषी विभागाने शेततळे बांधण्याचे आवाहन केले. पेरणी व अन्य तक्रारींसंदर्भात कृषी सहायकाशी शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याची सूचना केली. डोंगरगाव परिसरातील 2475 शेतकर्‍यांना सुमारे 17 कोटी रुपयांचा लाभ शेतकरी कर्ज माफी योजनेतून मिळाल्याची माहिती सहकार विभागाने दिली. शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी शिक्षणासंबंधी माहिती दिली. उज्ज्वला गॅस योजनेचे शिबिर येत्या 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत पुन्हा सुरु होत असून ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.