Published On : Mon, Dec 16th, 2019

शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्या – देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे 93 लाख हेक्टर शेतीचे नुकसान केले आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मात्र, राज्य शासनाने शेतकऱ्यांना एकूण 750 कोटी रुपयांची मदत केली आहे. अर्थातच शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे मत फडवणवीस यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनात सभागृहाबाहेर प्रसार माध्यमांना संबोधित करताना व्यक्त केले.

फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाला राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. राज्य विधीमंडळात 16 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. मात्र यापूर्वी भाजप पक्षाकडून 8 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या तरी यावर आपेक्ष घेतला जायचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर 25 हजार रुपयांची हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.

पुरवण्या मागण्यात पूरग्रस्तांसाठी उचललेला 4500 कोटी रुपये निधी परत करण्याची तरतूद आहे. यापूर्वी भाजपसोबत सत्तेत युती असताना शिवसेनेने स्वतःहून २५ हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती . सध्या शिवसेनेचेच मुख्यमंत्री असताना अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना किमान 23 हजार कोटी रुपयांची मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने तसे न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, आपण याचा निषेध करीत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.