Published On : Mon, Sep 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

गरब्याच्या नावाखाली मुलींची ‘बोली’? महाराष्ट्रात संताप; संभाजी ब्रिगेडचा इशारा

Advertisement

गरब्याच्या नावाखाली मुलींची ‘बोली’? महाराष्ट्रात संताप; संभाजी ब्रिगेडचा इशारा

नागपूर : नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांची लगबग सुरू असतानाच महाराष्ट्रात गरब्यासाठी मुलींना कथितरित्या भाडेतत्त्वावर बोलावले जात असल्याचा आरोप समोर आला आहे. काही ठिकाणी मुला-मुलींना गरबा खेळण्यासाठी एक ते पाच हजार रुपयांपर्यंत पैसे देऊन बोलावले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारावरून संभाजी ब्रिगेडने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवरात्रोत्सव हा भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव मानला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गरबा-दांडियाला विशेष महत्त्व असून, नऊ दिवसांच्या उत्सवात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, या पारंपरिक उत्सवाच्या नावाखाली व्यावसायिक स्वरूपाचे किंवा आक्षेपार्ह प्रकार होत असतील, तर त्याला आळा घालण्याची गरज असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी या कथित प्रकारावर आक्षेप घेतला आहे. गरबा कार्यक्रमांसाठी मुला-मुलींना पैसे देऊन बोलावण्याची पद्धत सुरू असेल, तर असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. पुरोगामी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणाला बाधा आणणारे प्रकार थांबवण्याची मागणीही त्यांनी केली.

उत्सवाच्या काळात आयोजकांनी पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे भान ठेवावे, तसेच कार्यक्रमांच्या नावाखाली गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे. दरम्यान, मुलींच्या कथित ‘भाडेतत्त्वावरील’ सहभागाबाबतचे आरोप कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कार्यक्रमांमध्ये झाले, याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.