नागपूर : नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात, नागपूरमध्ये, एका शासकीय मुलींच्या वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांच्या शहरात मुली सुरक्षित नाहीत, मग राज्यात काय परिस्थिती असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काय आहे प्रकरण?
ही घटना २२ जुलै रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन अज्ञात आरोपींनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एका विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून तिच्याशी अश्लील वर्तन केले. विद्यार्थिनीने प्रतिकार करत आरडाओरडा केला असता, आरोपी तिचा मोबाइल घेऊन फरार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर दोन दिवस उलटून गेले तरीही आरोपींचा शोध लागलेला नाही.
सदर वसतिगृहात एकूण ६४ मुली राहत असून, या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे वसतिगृहात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावलेले नाहीत.
वडेट्टीवारांचा सवाल – पोलिसांचा धाक राहिला नाही का?
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचेच आहेत. आणि तिथेच जर मुली सुरक्षित नसतील, तर राज्यात काय परिस्थिती असेल? एका वसतिगृहात दोन लोक घुसतात, मुलीशी छेडछाड करतात, मोबाइल चोरी करतात आणि फरार होतात, याचा अर्थ पोलिसांचा धाक राहिलेला नाही.”
ते पुढे म्हणाले, “या वसतिगृहाजवळच दारूचे दुकान आहे. त्यामुळे मुलींना रोज असुरक्षिततेची जाणीव होते. अशा ठिकाणी वसतिगृह चालवण्याचे धोरणच चुकीचे आहे. मुली कुणाच्या भरवशावर राहणार?”
काँग्रेसने केली मागणी –
विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे मागणी केली की, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच, राज्यातील सर्व मुलींच्या वसतिगृहांमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी. जर मुख्यमंत्र्यांच्या गडातच मुली असुरक्षित असतील, तर इतर भागांचा विचारच करायला नको. सरकारने आपल्या जबाबदारीपासून पळ काढू नये,” असे वडेट्टीवारांनी ठणकावून सांगितले.