Published On : Wed, Sep 29th, 2021

क्लीन इंडीया मोहीमेत मिळणार कचऱ्यापासून मुक्ती

Advertisement

मोहिमेत सक्रीय सहभागासाठी प्रशासनाचे आवाहन

नागपूर : आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत 1 ते 31 ऑक्टोबर महिन्यात क्लीन इंडीया मोहीम राबविण्‍यात येणार आहे. त्यामध्ये गावापासून तर महानगरपालिका क्षेत्रापर्यंत लोकसहभागाने स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज केले.

छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी या मोहीमेच्या पुर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे राजू बुरोले, पोलीस निरीक्षक आर. डी निकम, उपशिक्षणाधिकारी सुजाता आगरकर, क्रीडा अधिकारी माया दुबळे, आकाशवाणीच्या कार्यक्रम प्रमुख सुनालीनी शर्मा यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून या मोहीमेच समन्वयन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे उदय वीर युवा अधिकारी यांनी सांगितले. यासाठी घरोघरी जाऊन कचरा विशेषत: प्लास्टीक गोळा करण्यात येणार आहे. तसेच गावागावातील युवक तसेच महिला मंडळ व स्वयंसेवी संस्थामार्फत स्वच्छता करण्यात येईल. नेहरू युवा केंद्राच्या युवक युवतीचा यात सक्रीय सहभाग असणार आहे. ऐतिहासिक पुतळे, पंचायत समिती कार्यालयांसह स्वच्छता करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळ, शैक्षणिक संस्था, बस स्टॅण्ड तसेच राष्ट्रीय महामार्ग, हेरीटेज इमारतीचे, तसेच पिण्याच्या पाण्याची उगमस्त्रोतही स्वच्छ करण्यात येतील. यासाठी नगरपरिषद निहाय आराखडा तयार करण्यात येईल.

1 ऑक्टोबर रोजी केद्रीय युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रयागराज येथे उदघाटन होईल. क्लीन इंडिया मोहीमेची संपूर्ण माहिती यावेळी उदय वीर यांनी दिली. क्लीन इंडिया मोहीमेच्या समाज माध्यमांत प्रभावी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. संकलित केलेल्या कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येईल. याबाबतची माहिती रोज डॅशबोर्डच्या माध्यमातून अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले.