नागपूर : शहरभर उत्साहाचं वातावरण! नागपुरात सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन सुरू झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात भक्त बाप्पाचे स्वागत करत आहेत. गणपती आगमनाचा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण असतो, आणि यंदाही नागपूरकरांनी उत्साहात सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित केला आहे.
याच पार्श्वभूमीवर गणेश टेकडी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नागपूरकरांचे आराध्य दैवत आणि शहरातील प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील स्वयंभू गणपतीची मूर्ती हे 350 वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपते.
दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली असून, ही दृश्ये प्रत्येकाच्या मनाला मोहून घेत आहेत. भक्तगण तसेच पर्यटक या साजशृंगाराचा आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भेट देत आहेत.