Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गांजा तस्करीवर कळमना पोलिसांचा प्रहार; तीन आरोपी अटकेत, 33.41 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : कळमना पोलिसांच्या तपास पथकाने अवैध गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 10.432 किलो गांजा, 16 चाकी ट्रक, अॅक्टिव्हा, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण 33 लाख 41 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजा नागपुरात आणून त्याची विक्री केली जाणार होती. त्यानुसार कळमना तपास पथकाने सापळा रचला. एच.बी. टाऊन ते चिखली चौक मार्गावरील कालीमाता मंदिराजवळ पहाटे सुमारे 2.15 वाजता एका अॅक्टिव्हा चालकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या पोत्यात गांजा आढळून आला.

चौकशीदरम्यान हा गांजा ओडिशातून 16 चाकी ट्रकमधून आणल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ऑटोमोटिव्ह चौक परिसरात तो ताब्यात घेतला. एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष झडती घेतली असता 10.432 किलो गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणात रिंकू सुरेश राजपूत (30), गुरुप्रीत सिंग सुरजीत मुल्तानी (43) आणि बाल्या सुभाष भडके (40) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 10.432 किलो गांजा, एक अॅक्टिव्हा, 16 चाकी टाटा ट्रक, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 33.41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा तस्करीच्या साखळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे तसेच कळमना पोलिसांच्या तपास पथकाने केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.