नागपूर – एका उभरत्या बिल्डरकडून खंडणी वसूल करण्यासाठी धमकी देणाऱ्या सराईत गुंडाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अनिकेत ऊर्फ बबलू सोनवणे (वय २४, रा. यादव नगर, लक्ष्मीनगर) याने एका सात मजली इमारतीच्या बांधकामावर नजर ठेवून बिल्डरकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम राठोड (४५, रा. धरमपेठ) हे व्यावसायिक बिल्डर असून लक्ष्मीनगर परिसरात त्यांच्या नवीन प्रोजेक्टचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी बबलू या भागात वारंवार येऊन कामगारांना त्रास देत होता व दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता.
शनिवारी (ता.५) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास बबलूने थेट शिवम राठोड यांच्या कार्यालयात धडक मारली. “तू इथे मोठं बांधकाम करतोस, मला पाच लाख रुपये दे, नाहीतर परिणाम गंभीर भोगावे लागतील,” असे धमकावत त्याने चाकू दाखवला.
पोलीस आयुक्तांच्या निर्देशावरून अंबाझरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बबलूला अटक केली. चौकशीतून समजले की, तो काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटून आला असून त्याच्यावर आधीपासून चोरी, धमकी, हाणामारी यासारखे गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.