नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गंभीर आरोपांसह याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवल्याचा, आणि त्यांच्या भाषणांमुळे राज्यात हिंसाचार उफाळल्याचा ठपका याचिकेत ठेवण्यात आला आहे.उत्तर भारतीय विकास सेना या राजकीय संघटनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी वकिल श्रीराम परक्कट यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे.
यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला मनसेची मान्यता रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली असून, पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करावा, अशी विनंती केली आहे.शुक्ला यांचा आरोप आहे की, गुढीपाडवा निमित्त राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवर हल्ले वाढले आहेत.
डी मार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर, बँकेतील कर्मचार्यावर आणि एका सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.याचिकेत दावा करण्यात आला आहे की, हे सर्व प्रकार भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे ठरतात, आणि याकडे पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आहे.
राजकारण तापले –
या याचिकेमुळे मनसे आणि राज ठाकरे यांच्याभोवती पुन्हा एकदा वादाचे वळण तयार झाले आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शुक्ला यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची मागणीही न्यायालयाकडे केली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत राज ठाकरेंना अशा प्रकारची भाषणं थांबवण्याचे आदेश द्यावेत, असंही याचिकेत नमूद आहे.