नागपूर – शहरातील विविध भागांमध्ये बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीच्या तीन सदस्यांना अटक केली असून त्यांच्या जवळून सुमारे १ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरिफ उर्फ बंगाली, तौसीफ उर्फ घोडा आसिफ खान आणि अब्दुल इमरान अब्दुल अकिल यांचा समावेश आहे. या टोळीचा प्रमुख आरिफ असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी आरोपींकडून १८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७० ग्रॅम चांदी आणि १८ विविध धातूंच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या आरोपींनी कलमना, शांतिनगर, गिट्टीखदान, पारडी, यशोधरानगर आणि मौदा या परिसरांतील एकूण ११ घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
२९ मे रोजी कामठी रोडवरील तुकाराम नगर येथे राहणारे डॉ. जितेश मेश्राम हे कुटुंबीयांसह नागभीडला गेले असताना त्यांच्या घरातील कुलूप तोडून या टोळीने १ लाख २८ हजार रुपयांचे सोनं-चांदीचे दागिने लंपास केले होते.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी डॉ. मेश्राम यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलिसांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तौसीफ उर्फ घोडा याच्यावर संशय गेला. त्याला १२ जुलै रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अब्दुल इमरानचे नाव सांगितले. अब्दुलने चौकशीत आरिफ उर्फ बंगालीचा उल्लेख केला, जो सुरुवातीला फरार होता. मात्र पोलिसांनी त्यालाही शोधून काढत अटक केली आणि अखेर या ११ घरफोड्यांचा खुलासा झाला.
पोलिसांचा हा तपास आणि कारवाई कौतुकास्पद ठरली असून, शहरातील नागरिकांमध्ये एक दिलासा निर्माण झाला आहे.