नागपूर : नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत एक वाहनचोर गजाआड केला आहे. या आरोपीकडून तब्बल तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी गर्दीच्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या अवस्थेतून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास तक्रारदार शोएब खान अमानुल्ला खान यांनी आपली दुचाकी मेयो रुग्णालयाच्या आयसीयू इमारतीजवळ पार्क केली होती. मात्र काही वेळानंतर ते परत आले असता त्यांना आपली दुचाकी गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तहसील पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान तहसील पोलिस पथक गस्त घालत असताना लाल इमली चौकात एका संशयित तरुणाला चोरीस गेलेल्या दुचाकीवर आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या तरुणाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव नीलेश अशोक कन्हेरे असे सांगितले असून तो सावनेर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस चौकशीत त्याने केवळ एकच नव्हे तर तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या माहितीनुसार उर्वरित गाड्याही हस्तगत केल्या आहेत. सद्यस्थितीत पुढील तपास तहसील पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, वाहनचोरीप्रमाणेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.