नागपूर – शहरात सात चोरीचे प्रकार उघडकीस आणत नागपूरच्या पारडी पोलिसांनी एका अंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीतील इतर दोन आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
गेल्या महिन्यातील चोरीमुळे पोलिसांची कारवाई सुरू
२१ जून रोजी नागेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या अनुपम वाघमारे या महिलेनं आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासह पुलगाव येथे प्रवास केला होता. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून सोनं, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. त्यांनी याची तक्रार पारडी पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
मध्य प्रदेशातून आरोपीला अटक –
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, संदीप टेंभरे नावाच्या सराईत चोराने आपल्या साथीदारांसह ही चोरी केली आहे. पोलिसांनी तत्काळ मध्य प्रदेशातील सिवनी येथे जाऊन संदीप टेंभरे आणि त्याचा साथीदार महेंद्र कुशवाहा यांना अटक केली. चौकशीत या दोघांनी नागपूरमधील सात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
११ लाखांचा ऐवज जप्त, संदीपवर २० हून अधिक गुन्हे-
पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून सुमारे ११ लाख रुपये किमतीचे दागिने व इतर ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे, संदीप टेंभरेवर याआधीही २० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला जुगाराची लत असून, त्यासाठीच तो वारंवार चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू-
फरार असलेल्या टोळीच्या दोन सदस्यांचा शोध सुरू असून, ही टोळी अन्य राज्यांमध्येही सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पारडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी चोरीचे प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.