नागपूर : शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना मोहजालात अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारी एक ‘हनी ट्रॅप’ टोळी सध्या नागपूरमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीत सुमारे सात जणांचा समावेश असून, त्यामध्ये पुरुष आणि महिलांचा सहभाग आहे. या टोळीतील काही सदस्य स्वतःला पत्रकार असल्याचे भासवत पीडितांना फसवतात, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या टोळीने गेल्या काही वर्षांत नागपूरमध्ये आपले जाळे पसरवले असून, मुख्यतः नावाजलेल्या व्यापाऱ्यांनाच आपल्या टार्गेटवर ठेवले जाते. या टोळीतील एका महिलेने तर एका नामवंत व्यापाऱ्याला इतक्या गोडीगुलाबीने जाळ्यात ओढले आहे की, तो तिच्यासोबत मुंबई-दिल्ली अशा ठिकाणी वारंवार प्रवास करत आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यापारी केवळ व्यवसायातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही प्रसिद्ध असूनही त्याचा अशा प्रकारच्या जाळ्यात अडकणं हे अनेकांना धक्कादायक वाटत आहे.
टोळीतील काही सदस्यांनी विधानमंडळाच्या अलीकडील पावसाळी अधिवेशनातही मुंबईत उपस्थिती लावल्याची माहिती समोर आली आहे. काही व्यापाऱ्यांनी या टोळीचा त्रास झाल्याची कबुली काही पत्रकारांसमोर दिली असली तरी, समाजात आपली प्रतिमा खराब होईल या भीतीने कोणीही उघडपणे तक्रार करण्यास तयार नाही.
एका व्यापाऱ्याने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सापळाही रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्याची भनक टोळीला लागल्याने आरोपी ठरलेल्या जागी पोहचलेच नाहीत. काही दिवसांपूर्वी या टोळीतील एका सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण तक्रारदार मागे फिरल्याने कारवाई होऊ शकली नाही.
याआधीही नागपूरमध्ये ‘विषकन्या’ प्रकरण गाजलं होतं, जिच्या मोहपाशात व्यापारी आणि काही राजकीय नेते अडकले होते. अखेर तिच्यावरही कठोर कारवाई झाली होती. सद्यस्थितीत सुरू असलेलं हनी ट्रॅप प्रकरणही तसंच मोठं रूप धारण करणार का, याकडे संपूर्ण नागपूरचं लक्ष लागलं आहे. पोलिसांकडून लवकरच या टोळीचा पर्दाफाश होईल, अशी शक्यता आहे.