नवी दिल्ली: देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण देशात उत्साहात साजरा होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणारे लष्कराचे भव्य संचलन, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, थरारक कवायती आणि देशभरातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ विशेष लक्ष वेधून घेणार असून, या चित्ररथातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा सादर केली जाणार आहे. आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून ‘गणेशोत्सव’ ही संकल्पना यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी मांडण्यात आली आहे.
या चित्ररथामध्ये शाडू मातीपासून घडवलेल्या गणेशमूर्तींच्या प्रतिकृती, कोकणात पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून नेल्या जाणाऱ्या गणेशमूर्तींचे दृश्य, तसेच अष्टविनायकांची प्रतिकृती आणि प्रमुख गणेश मंदिरे यांचे सजीव दर्शन घडवले जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही या चित्ररथातून दिला जाणार आहे.
याशिवाय, चित्ररथासोबत सहभागी होणारे लोककलावंत आणि कलाकार महाराष्ट्रातील लोककला, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण करणार असून, कर्तव्यपथावर संपूर्ण महाराष्ट्राची सांस्कृतिक झलक पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, २६ जानेवारी २०२६ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात देशातील १७ राज्ये आणि १३ केंद्रीय मंत्रालयांचे मिळून एकूण ३० चित्ररथ सहभागी होणार आहेत. विविधतेत एकता दर्शवणारा हा सोहळा देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचे दर्शन घडवणार आहे.









