नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवर शंका उपस्थित करणारे काँग्रेसचे विधीमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कॅमेऱ्याच्या नियंत्रणात पार पडलेल्या पारदर्शक प्रक्रियेवर संशय घेणे वडेट्टीवारांसारख्या वरिष्ठ नेत्यांना शोभणारे नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व महापौरपदांच्या आरक्षण सोडती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडल्या आहेत. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप शक्य नसताना ‘फिक्सिंग’सारखे आरोप करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे.
निकाल अनुकूल नसले की आरोपांची परंपरा-
आपल्या सोयीनुसार निर्णय लागला नाही की विरोधकांकडून अशा प्रकारचे आरोप केले जातात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. निवडणूक निकाल प्रतिकूल लागले की ईव्हीएमवर आरोप होतात, मात्र निकाल अनुकूल लागला की त्याच ईव्हीएमवर मौन बाळगले जाते, असेही ते म्हणाले.
नागपूरमध्ये महिलेला नेतृत्वाची संधी-
नागपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षण जाहीर झाल्याने शहराला महिला नेतृत्व मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये महिलांना महापौर होण्याची संधी मिळत आहे, ही सकारात्मक बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
२० लाख कोटींची गुंतवणूक; विरोधकांवर टीका-
दावोस परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी तब्बल २० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा करत बावनकुळे म्हणाले की, यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला हवा. रोजगाराच्या मुद्द्यावरून टीका करणारेच नेते, रोजगाराच्या संधी निर्माण होत असताना सरकारवर आरोप करून राज्याची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक-
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वच्छ व पारदर्शक कारभाराचे प्रतीक असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्र अधिक सक्षम होईल.
बोर व्याघ्र प्रकल्पाला नवे गेट-
विदर्भातील ताडोबा-पेंचसोबतच बोर व्याघ्र प्रकल्पही जागतिक स्तरावर ओळख निर्माण करत असून, नव्या गेटमुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर निवडीवर लवकरच निर्णय-
नागपूरच्या महापौरपदाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.









