नागपूर : देशभरात ठिकठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र यादरम्य सर्व सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.बाप्पाचा आवडता मोदक महाग झाल्याची माहिती समोर आली आहे. नारळ, पीठ, गूळ, चारोळ्या, वेलची यांसह इतर घटकांच्या वाढलेल्या किमतींमुळे मोदक तयार करणे आता महागडे झाले आहे. याचसोबत, उत्सवात लागणारे सजावटीचे साहित्य, झेंडू, फुले, प्रसाद आणि मिठाईच्या किमतीही सामान्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत.
कडधान्याच्या दरांतही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने गणेशोत्सव साजरा करण्याचा खर्च सामान्यांच्या हाती जास्त पडत आहे. तरीही भक्त म्हणतात, “होऊ द्या खर्च”, आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी उत्साहपूर्वक सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सव यंदा २७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, सरकारने यावेळी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केले आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह दुपटीने वाढला आहे, बाजारपेठाही सजावटीच्या वस्तू, मोदक आणि मूर्तींसह गर्दीने भरलेली आहे.
मूर्तींच्या किमती वाढल्या – गृहोपयोगी वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे बाप्पाच्या मूर्तींच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. उत्पादन खर्च, कामगारांची वाढलेली मजुरी आणि रंगाच्या किमती वाढल्याने मूर्ती महागल्या आहेत. मूर्तिकारांच्या मते, या वाढीमुळे मंडळांवर आर्थिक ताण येत आहे.
दरवाढीचे तपशील: चणाडाळ १०० रुपये किलो, गूळ ८०, तूरडाळ १६०, मुगडाळ १३५, मसूर १००, तेल १४०, साखर ४६, शेंगदाणा १४०, नारळ ४०, खोबरे २०० वरून ४००, आक्रोड १४०० वरून २०००, चारोळी ८०० वरून ३०००, वेलची ३६०० वरून ४००० रुपये पर्यंत पोहोचली आहे.
तरीही, या वाढलेल्या खर्चामुळे भक्तांचा उत्साह कमी होण्याऐवजी बाप्पासाठी उत्सवात सहभागी होण्याची तयारी जोरात सुरू आहे.