Published On : Thu, Jul 11th, 2019

गांधीसागर तलाव : पोत्यात मिळाले युवकाचे धड

नागपूर : गांधीसागर तलावात बुधवारी रात्री अज्ञात युवकाचे पोत्यात बांधलेले धड मिळाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञातस्थळी युवकाची हत्या करून डोके आणि हातपाय कापल्यानंतर धड पोत्यात बांधून गांधीसागर तलावात फेकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

टाटा पारसी शाळेसमोरील पागे उद्यानालगत गांधीसागर तलावात लोकांना पोते दिसून आले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. जगदीश खरे यांनी पोते बाहेर काढले. पोत्यात केवळ धड मिळाले. मृताचे डोके आणि हातपाय कापले होते. मृताची अवस्था पाहून पोते तीन ते चार दिवसांपूर्वी तलावात फेकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना कोणतीही वस्तू मिळाली नाही.

पोलीस शहरातील ठाण्यांमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती घेत आहेत. मृताची ओळख पटल्यानंतर खरी बाब पुढे येणार आहे. घटनेत सराईत गुन्हेगार लिप्त असल्याची पोलिसांना शंका आहे. हत्येनंतर डोके आणि हातपाय कापून मृताला तलावात फेकण्याची हिंमत कुणी सामान्य गुन्हेगार करू शकत नाही. वरिष्ठ अधिकारी रात्रीपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्यात या घटनेची चौकशी करीत आहेत.