नागपूर : धर्म, संस्कृती, इतिहास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने ‘जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येते. गेल्या ३९ वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे ४०वे वर्ष असून यंदाचा पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे. १ लाख ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिवकथाकार तथा छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक परमपूज्य सद्गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख, सचिव भालचंद्र देशकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९३व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठानने या पुरस्काराची घोषणा करताना आनंद व्यक्त केला.
कोरोना परिस्थितीमुळे पुरस्कार वितरणाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आतापर्यंत चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, सेतूमाधवराव पगडी, गो. नी. दांडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस, धुंडा महाराज देगलूरकर, पद्मविभूषण तथा महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पंडीत महादेवशास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह ३८ मान्यवरांना ‘जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे.
