
नागपूर :नागपूर शहरातील रिझर्व्ह बँक चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या सिमेंट रस्त्याच्या उद्घाटनासह विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावर थेट भाष्य केले. नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना उद्देशून त्यांनी मिश्कील शैलीत पण स्पष्ट शब्दांत संदेश दिला.
“रस्ते नवे बनतात, पण फुटपाथवर पुन्हा दुकाने उभी राहतात. मग नागरिक चालणार कुठे?” असा प्रश्न उपस्थित करत गडकरी म्हणाले, “रस्ते चकचकीत दिसायला हवेत, त्यासाठी अतिक्रमणांवर कारवाई आवश्यक आहे.” त्यांच्या या हलक्याफुलक्या टोमण्यावर उपस्थितांमध्ये हास्य आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक चौक ते ऑटोमोटिव्ह चौक हा सिमेंट रस्ता नागपूरकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. तसेच शहरातील उड्डाणपूल, रस्ते आणि मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अधिक गती देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
अतिक्रमण ही शहराच्या सौंदर्यीकरणातील मोठी अडचण असल्याचे नमूद करत गडकरी म्हणाले, “रस्ते कितीही चांगले असले तरी फुटपाथ मोकळे नसतील, तर सर्वसामान्य माणसाला त्रासच होणार.” त्यांच्या या वक्तव्यावर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक कारवाई करण्याचे संकेत दिले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. नागपूरचा सर्वांगीण विकास हे आपले प्रमुख ध्येय असून, शहराला आधुनिक मल्टिमोडल हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी दिला जात असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. नागपूरकरांसाठी हा कार्यक्रम विकासाची नवी आशा देणारा ठरला.








