
नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात कन्हान नदीच्या पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी गावकऱ्यांच्या निदर्शनास नदीत तरंगणारा मृतदेह आला. त्यानंतर तातडीने खापरखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षांच्या दरम्यान आहे. भानखेडा येथील कन्वेयर बेल्ट लाईनच्या खाली कन्हान नदीत हा मृतदेह आढळून आला. मात्र, अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.
खापरखेडा पोलीस परिसरातील तसेच लगतच्या भागांतील गेल्या काही दिवसांत बेपत्ता असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करत आहेत. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.








