
नागपूर :उपराजधानी नागपुराच्या विकासाच्या वाटचालीत सोमवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहर व जिल्ह्यातील तब्बल ३,४१२ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. फ्लायओव्हर, सिमेंट रस्ते आणि पायाभूत सुविधांमुळे शहराच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. नागपूर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये आपले स्थान भक्कम करत असून, रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.
या विकास पॅकेजमध्ये महारेलकडून ६०७ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेले १२ फ्लायओव्हर आणि आरयूबी (रोड अंडर ब्रिज) नागरिकांना समर्पित करण्यात आले. तसेच मेयो हॉस्पिटल चौक ते प्रजापती नगर दरम्यान १५० कोटी रुपयांचा सिमेंट रस्ता आणि आरबीआय चौक ते ऑटोमोटिव्ह चौकदरम्यान १५० कोटींच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय एनआयटी आणि नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुमारे १,००० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची सुरुवात झाली.
याचवेळी हरिहर मंदिर–वर्धमान नगर फ्लायओव्हरचे लोकार्पण करण्यात आले. काटोल शहरातील आरयूबीचेही उद्घाटन करण्यात आले. राज्यभरातील महारेलद्वारे पूर्ण झालेले इतर फ्लायओव्हर आणि आरयूबी देखील या कार्यक्रमात नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील विकास कामांची माहिती देत सांगितले की, शहरातील रस्ते मजबुतीकरण, वाहतूक सुलभीकरण आणि पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. नागपूरसह संपूर्ण राज्यात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात असून, भविष्यात शहराचा चेहरामोहरा अधिक आधुनिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकास कामांबद्दल आमदार कृष्णा खोपडे यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले. फ्लायओव्हर आणि रस्त्यांच्या कामांमुळे विशेषतः पूर्व नागपुरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर नागपूरकरांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.








