Published On : Fri, Mar 15th, 2019

अन् नितीन गडकरी म्हणाले… सर, आशीर्वाद द्या!

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात सदिच्छा भेट घेतली. जोशी नागपुरात जाहीर व्याख्यानासाठी आले असता त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

गडकरी यांनी जोशी यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले यावेळी दोघांमध्ये बराच वेळ विविध विषयांवर चर्चा देखील झाली. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारी दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांना नागपुरातच संबोधित करणार आहेत. सेना भाजपा यांची युती झाली हे राज्याच्या हिताचे झाले आहे. आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित काम करायला हवं अशी अपेक्षा जोशी व गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

१९९६ साली राज्यात युती सत्तेवर आली, तेव्हा जोशी मुख्यमंत्री होते तर नितीन गडकरी यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. जोशी यांनी त्यावेळी गडकरी यांच्यावर विश्वास टाकला होता, व त्याच कारकिदीर्ने गडकरी यांना एक गतिमान मंत्री ही ओळख दिली.