Published On : Fri, Mar 15th, 2019

चार हजार फ्लेक्स, दीड हजार बॅनर्स काढले

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात ४८ फ्लाईंग स्क्वॉड तसेच ३६ चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करताना सुमारे ५ हजार ४०० फ्लेक्स व बॅनर्स काढण्यात आले आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात पारदर्शकपणे निवडणुका पार पाडताना आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला आहे.

या कक्षामध्ये विधानसभा मतदार संघनिहाय दररोज आचारसंहितेसंदर्भातील सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेण्यात येत असून फ्लाईंग स्क्वॉड तसेच चेकपोस्टच्या माध्यमातूनही संपूर्ण जिल्ह्यात २४ तास अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चार फ्लाईंग स्क्वॉड व तीन चेकपोस्ट तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जिल्ह्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे त्याचा भंग होणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.