Published On : Wed, Aug 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गडचिरोलीत सर्पदंशाची दहशत; 225 विद्यार्थ्यांनी सोडली आश्रमशाळा

Advertisement

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला असून, शाळेतील 233 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 225 विद्यार्थ्यांना पालकांनी घरी नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गजबजणारी आश्रमशाळा सध्या जवळपास ओस पडली आहे. या घटनेची ताजी माहिती स्थानिक वृत्तांतूनही समोर आली आहे.

रात्री झोपेत असताना सर्पदंश-
जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनी झोपलेल्या असताना सापाने दंश केल्याची घटना घडली. यामध्ये तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर इतर जखमी विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेनंतर आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. अनेक पालकांनी तातडीने शाळेत पोहोचून आपल्या पाल्यांना घरी नेले. परिणामी अवघ्या दोन दिवसांत शाळेतील विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

मुख्याध्यापकांसह तिघांविरोधात गुन्हा-
घटनेप्रकरणी शाळेतील सुरक्षाव्यवस्थेतील कथित निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक प्रशांत विलास ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिलमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का, याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेही शाळेची पाहणी करून अहवाल सादर केल्याची माहिती आहे.

जखमी विद्यार्थिनींवर उपचार-
सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींवर गडचिरोलीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांची चिंता कायम आहे.

व्याहाड बुर्जमध्येही दाम्पत्याला सर्पदंश-
जपतलाईची घटना ताजी असतानाच गडचिरोलीजवळील व्याहाड बुर्ज येथे सर्पदंशाची आणखी एक घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या अमोल अनिल वसेकर आणि त्यांच्या पत्नी सुगंधा वसेकर यांना मण्यार सापाने दंश केल्याची माहिती आहे. दोघांनाही उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलग सर्पदंशाच्या घटनांमुळे गडचिरोली परिसरात नागरिकांमध्येही भीती वाढली आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.