
नागपूर : शहरातील संघटित गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. परिमंडळ क्रमांक 5 अंतर्गत जुलै महिन्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 27 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. यासोबतच 12 गँग हिस्ट्रीशीट उघडून 58 आरोपींना प्रतिबंधात्मक निगराणीखाली आणण्यात आले आहे.
यशोधरानगर, कळमणा आणि भांडेवाडी परिसरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे 3, 10 आणि 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला. तर कळमणा पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात 7 आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली.
सराईत आणि संघटित पद्धतीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, गँग हिस्ट्रीशीट उघडण्यात आलेल्या 58 आरोपींच्या हालचालींवर आता पोलिसांची नजर राहणार आहे. गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात करण्यात आली. संघटित गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




