Published On : Thu, Jun 27th, 2019

घाट रस्त्याचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करा!

Advertisement

कार्यकारी महापौर आणि स्थायी समिती सभापतींचे निर्देश : डालडा फॅक्ट्री-घाट रोडचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाही अल्टीमेटम

नागपूर : बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम सात दिवसांत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देतानाच कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी पाच महिन्यांपासून इमामवाडा-डालडा फॅक्ट्री-घाट रोड दरम्यान रखडलेल्या कामासाठी कंत्राटदाराला अल्टीमेटम दिला.

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांनी या दोन्ही रस्त्यांचा गुरुवारी (ता. २७) पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके होते. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सी. आर. गभणे यांच्यासह मुकेश कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार मुकेश माधवानी, भूषण इंगळे, आशीष मेहर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पदाधिकाऱ्यांनी बैद्यनाथ चौक ते रेल्वे अंडर ब्रीज दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री निधीतून होत असून गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. याची दखल घेत आज कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी रस्त्याच्या कामाची माहिती देत कामात येणारे अडथळे सांगितले. काही अडचण आल्यास पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात यावी. उर्वरीत काम सोमवारी सुरुवात करुन गुरुवारपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.

यानंतर इमामवाडा-डालडा फॅक्टरी-ग्रेट नाग रोड-आयसोलेशन हॉस्पीटलदरम्यानच्या रस्त्याचीही पाहणी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी केली. सदर काम जे.पी. एंटरप्राईजेसकडे असल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. यावेळी परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे येत असलेल्या समस्याही त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जाणून घेतल्या.

यावेळी स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे यांनी कंत्राटदाराशी मोबाईलवरून संपर्क साधत कामासंदर्भात अल्टीमेटम दिला. पाच महिन्यांपासून काम रखडले असून जर कंत्राटातील अटी व नियमांचे पालन झाले नाही तर देयके थांबविण्यात येतील, असा अल्टीमेटम त्यांनी दिला. या दोन्ही कामांचा पाठपुरावा आपण स्वत: करणार असून तातडीने हे बांधकाम पूर्ण करण्यात यावे आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.