Published On : Sat, Dec 2nd, 2017

नवीन मतदारांना 15 डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदण्याची संधी


नागपूर: मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदाराची नोंदणी तसेच वंचित मतदारांची यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2018 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रीय अधिकारी मतदारांच्या घरी जावून निवडणूक आयोगाने दिलेल्या विवरणपत्रात अथवा स्मार्ट फोन असेल त्यांनी आपल्या मोबाईल ॲपवर नेमून दिलेली माहिती ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्जाची माहिती भरुन द्यावयाची आहे.

जिल्हयातील सर्व मतदान केंद्रात, मतदार मदत केंद्र, तसेच संबंधित विधानसभा मतदार संघातील कार्यालयात मतदार नोंदणीचे अर्ज क्रमांक 6, 6 अ, 7, 8 व 8 अ स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार यादीतील मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबतची कार्यवाही बीएलओ यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या नो वोटर टू बी लेफ्ट बिहाईंड या घोषवाक्यानुसार प्रत्येक पात्र मतदाराने मतदार यादीत नाव नोंदवून मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी होवून आपले नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.