Published On : Mon, Oct 18th, 2021

हिवरीनगर येथील संताजी हॉलमध्ये मोफत नेत्र व दंत तपासणी शिबीर

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमवारी (ता. १८) हिवरीनगर येथील संताजी हॉलमध्ये महापौर नेत्र व दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे उदघाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर उपस्थित होते.

महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने ‘आझादी -७५’ अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने ७५ नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येत आहेत. तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत हिवरीनगर येथील संताजी हॉलमध्ये हे दोन्ही शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना नंबर देणे, मोतिबिंदू असलेल्यांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दंत शिबिरामध्ये दातांची सफाई, फिलिंग करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी आली. पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये करण्यात येतील. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी दिली.