Published On : Mon, Oct 18th, 2021

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ रेल्वेस्थानकावर आंदोलन

Advertisement

-संयुक्त किसान मोर्चातर्फे निदर्शने
-अजनी, मनीषनगर आणि गड्डीगोदाम परिसरात पोलिस सज्ज

नागपूर: लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाèयांनी नागपूर रेल्वे स्थानकावर नारे निदर्शने केली. यानंतर निषेध सभा घेण्यात आली. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पोलिस प्रशासनाला आधीच कल्पना असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन असल्याने लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफचे पथक नागपूर, अजनी, मनिषनगर आणि गड्डीगोदाम परिसरात तैनात होते. मात्र, दिलेली वेळ पूर्ण होवूनही आंदोलनकर्ते पोहोचले नव्हते.

दरम्यान दुपारी १२.३० वाजता किसान सभेचे जिल्हा सहसचिव गंगाराम खेडकर, अरूण वणकर, अ‍ॅड. थुलकर‌, रूखमा खेडकर, एस.टी.‌महामंडळ हॉकर्स युनियनचे मो. कलीम, गजानन साबळे, कृष्णकुमार तिवारी, शैलेश खोडे आदी पदाधिकारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम प्रवेशव्दारासमोर पोहोचले. आंदोलकांना पाहताच पोलिस सज्ज झाले. यावेळी बॅनर घेवून कार्यकत्र्यांनी निदर्शने केली. परंतु अपेक्षेनुसार कार्यकर्ते नसल्याने निषेध सभा घेवून आंदोलन समाप्त करण्यात आले. कार्यकत्र्यांची संख्या कमी असली तरी रेल्वे परिसरात आणि रेल्वे मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.

यावेळी नॅशनल डेमोक्रेटीक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष (राष्ट्रीय)धनराज वंजारी म्हणाले किसान आंदोलनाला समर्थन देने प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. अरूण वनकर म्हणाले लखीमपूर येथे शेतकरी आणि पत्रकाराच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. अशा मंत्र्याला पाठीशी घालने म्हणजे लोकशाहीचा गळा आवळण्यासारखा प्रकार आहे. गेल्या ११ महिण्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन म्हणजे देशातील लोकशाहीला वाचविण्याचे प्रतिक आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संकल्प त्यांनी केला.