Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ट्रकच्या दुहेरी नोंदणीचा बनावट रॅकेट उघड; तिघांविरुद्ध गुन्हा, मोठ्या नेटवर्कचा शोध सुरू

Advertisement

नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रकची दुहेरी नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक होमेश चंद्रकांत काळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये चार ट्रक अरुणाचल प्रदेशातून महाराष्ट्रात आणून त्यांची पुन्हा नोंदणी करण्यात आली होती. तपासादरम्यान या वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले.

प्राथमिक तपासात, मध्य प्रदेशातील देवास येथील कागदपत्रांच्या आधारे प्रथम अरुणाचल प्रदेशात वाहनांची पुनर्नोंदणी करण्यात आली. त्यानंतर तीच वाहने नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये सादर करून महाराष्ट्राचे नवीन नोंदणी क्रमांक मिळविण्यात आल्याचे उघड झाले. या संपूर्ण प्रक्रियेद्वारे शासनाची फसवणूक करून बेकायदेशीर लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल, दिनेश कुमार ओमप्रकाश आणि मोहम्मद एजाज अब्दुल रहमान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अशाच प्रकारे इतर वाहनांचीही दुहेरी नोंदणी करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणाचा संबंध वाहनचोरीच्या मोठ्या रॅकेटशी आहे का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यापूर्वी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासाशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचीही पडताळणी केली जाणार असल्याची माहिती कपिलनगर पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.